शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. सण
Written By वेबदुनिया|

श्रीकृष्ण लीलांमागील गूढार्थ

- प्रा. लक्ष्मीनारायण धूत

भागवत ग्रंथात वर्णन करण्यात आलेल्या श्रीकृष्ण लीलाचा उद्देश फक्त कृष्ण भक्तांची भक्तांची श्रद्धा वाढवणे एवढाच नसून मनुष्यमात्रास त्यातून अनमोल संदेश देण्यात आला आहे. श्रीमद्भागवत एक आध्यात्मिक ग्रंथ असून अध्यात्माचे लक्ष्य चेतना जागृत करण्याचे असते. एकंदरीत या प्रश्नांच्या संदर्भात त्या कथांना समजण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.

NDND
श्रीकृष्ण ऐतिहासिक पुरूष होते. छांदोग्य उपनिषदातील उल्लेखातून त्याचा पुरावा मिळतो. त्यानुसार देवकीपुत्र श्रीकृष्णास महर्षि आंगिरसांनी निष्काम कर्म रूप यज्ञ उपासनेचे शिक्षण दिले होते. या ज्ञानप्राप्तीनंतर श्रीकृष्ण 'तृप्त' अर्थात पूर्णपुरूष झाले होते. महाभारतातील वर्णनानुसार श्रीकृष्णाचे जीवन या शिक्षणानुसारच घडले. त्यांनी गीतेत याच ज्ञानाचे प्रतिपादन केले आहे. मात्र, त्यांच्या जन्म व बाल-जीवनाचे आपल्या माहितीतील वर्णन मूळत: श्रीमद्‍ भागवताचे आहे. ते ऐतिहासिक कमी व अध्यात्मिक अधिक आहे. ग्रंथाच्या अध्यात्मिक स्वरूपास अनुसरूनच ते आहे. ग्रंथातील भौतिक वर्णनात गहन अध्यात्मिक अर्थ दडला आहे. वास्तविक भागवतात सृष्टीची संपूर्ण विकास प्रक्रिया व त्या प्रक्रियेस गती देणार्‍या परमात्म शक्तिचे दर्शन घडवले आहे. ग्रंथांच्या पूर्वाधात सृष्टीचा क्रमिक विकास व उत्तरार्धात श्रीकृष्ण लीलेद्वारे व्यक्तीच्या अध्यात्मिक विकासाचे वर्णन प्रतिमात्मक शैलीत केले आहे. भागवतातील वर्णनानुसार श्रीकृष्ण लीलेतील मुख्य प्रसंगाचा अध्यात्मिक संदेश ओळखण्याचा येथे प्रयत्न करण्यात आला आहे.

श्रीकृष्ण जन्म : त्रिगुणात्मक प्रकृतीतून प्रकटणारी चेतना सत्ता!
श्रीकृष्ण आत्मतत्वाचे मूर्तिमंत रूप आहेत. प्राणीमात्रांमध्ये चेतनेच्या स्वरूपात ते उत्तरोत्तर अधिक अभिव्यक्त होतात. मनुष्यात या चेतन तत्वाचा पूर्ण विकासच आत्मतत्वाची जागृती होय. जीवन सृष्टीतून उद्धृत व विकसित होते. त्रिगुणात्मक सृष्टीच्या रूपात श्रीकृष्णाच्याही तीन माता आहेत. 1- रजोगुणी प्रकृतिरूप देवकी जन्मदात्री माता आहे. 2- सत्गुणी सृष्टीरूप माता यशोदा आहे. तिचा वात्सल्य व प्रेमरस पिऊन श्रीकृष्ण मोठे झाले. 3- याव्यतिरिक्त तमसरूपी पूतना माता आहे. तिला आत्मसृष्टीचे अंकुरण आवडले नाही. म्हणून वात्सल्याच्या अमृताऐवजी ती विष पाजते. मात्र, कृष्णास काहीही न होता पूतनेस आपला प्राण गमवावा लागतो. सृष्टीचेच तामस तत्व चेतन तत्वाचा विकास खुंटवण्यास असमर्थ असल्याचा संदेशच यातून मिळतो. भौतिक सृष्टीत विनाशाच्या असंख्य क्रिया सुरू असतानाही जीवन विकासाचा क्रम अखंड राहिला आहे. व्यक्तीच्या अध्यात्मिक विकासाच्या शक्यतांमधे वाढ झाली आहे. श्रीकृष्ण चेतनेचेच रूप असून त्रिगुणात्मक सृष्टीपासून निर्मित आपल्या मन व बुद्धीमध्ये चेतनेचा प्रकाश मन-बुद्धीच्या गुणस्थितीनुसारच होत असतो. मन-बुद्धीच्या विकासासोबतच कृष्ण चेतनेची प्रभाही अधिक प्रकाशित होत असते. श्रीकृष्ण जन्मकथेतून हे तत्वच अधोरेखित होते.

NDND
गोकुळ-वृंदावनातील लीला व क्रीडा-
बालवयातच श्रीकृष्णाद्वारे करण्यात आलेल्या राक्षसांच्या वधाच्या लीला व गोकुळातील मित्र व गावकऱ्यांतआनंद व प्रेम वाटणार्‍या क्रीडांचे विस्तृत वर्णन भागवतात करण्यात आले आहे. गोकुळ व वृंदावन येथे कृष्णाचे बालपण गेले. 'गो' शब्दाचा अर्थ इंद्रिये असाही होतो. त्यामुळे गोगुळ म्हणजे आपल्या पंचेंद्रीयांचा संसार व वृंदावन म्हणजे तुळसीवन. गोकळात पूतना वध, शकट भंजन व तृणावर्त वध व वृंदावनात बकासुर, अधासुर व धेनुकासुर इत्यादी राक्षस हननाचे वर्णन आहे. व्यक्ती व समाजास आंतरीक आसुरी वृत्तीच्या रूपात त्याची ओळख करावी लागेल. तेव्हाच नैतिक व अध्यात्मिक शक्तीच्या सामर्थ्यावर आसुरी शक्तींचे हनन शक्य आहे. आणि खर्‍या अर्थाने बालरूप श्रीकृष्णाचा उद्वव महाराभारताचा सूत्रधार, धर्मस्थापक श्रीकृष्णाच्या रूपात होणे शक्य होईल. पूतना मनुष्याच्या स्वार्थी तामसिक वृत्तीचे प्रतीक आहे, तर शकट म्हणजे ओझे वाहून नेणारी गाडी. अज्ञानाने जीवनास ओझे समजून जीवन कंठणार्‍या माणसाचे प्रतीक म्हणता येईल. याचप्रकारे तृणावर्त तुच्छ इच्छा, विषयांच्या फेर्‍यात अडकलेल्या जीवनाचे प्रतीक आहे. श्रीकृष्ण भाव उत्पन्न होताच त्यांचा नाश निश्चित आहे.

वृंदावनच्या कथेत कालिया नाग, गोवर्धन, रासलीला व महारास कथा प्रसिद्ध आहेत. श्रीकृष्णाने यमुनेस कालिया नागापासून मुक्त केले होते. यमुना, गंगा, सरस्वती या नद्या क्रमश. कर्म, भक्ति व ज्ञानाचे प्रतीक आहेत. कर्त्यांत कर्तेपणाचा अहंकार (विष) असते. हा अहंकार म्हणजेच यमुनेतील कालिया नाग होय. सर्वात्मरूप श्रीकृष्ण भावाचा उदय अहंकार-विषापासून कर्म व कर्त्यांचे रक्षण करते. गोवर्धन धारण कथेची आर्थिक, नैतिक व राजनैतिक व्याख्या करण्यात आली आहे. गो म्हणजे इंद्रियांचे पालन-पोषण, कर्ता म्हणजे इंद्रियातील क्रियाशील प्राण-शक्तिंचा स्त्रोत. परमेश्वराकडे आपली दृष्टी असायला पाहिजे. याप्रमाणेच गोपींसोबत रासलीलेच्या वर्णनात मनाच्या वृत्तीच गोपिकांच्या रूपात मांडल्या आहेत. प्रत्येक वृत्तीच्या आत्मरसात डुंबण्यास रासलीला किवा रास नृत्याच्या रूपात चित्रित करण्यात आले आहे.