गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 7 डिसेंबर 2019 (18:09 IST)

उन्नाव बलात्कार प्रकरण : दोषींना फाशी द्या, पीडितेच्या बहिणीची मागणी

न्याय मिळवण्यासाठी न्यायालयातील लढाई आम्ही सुरुच ठेवणार आहोत. ज्या लोकांनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला, त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या बहिणीने केली आहे.
 
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचा शुक्रवारी (6 डिसेंबर) रात्री उशिरा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
 
गुरुवारी आपल्या वकिलांना भेटायला जात असताना आरोपींनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिलं होतं. त्यात तिचं 90 टक्के शरीर भाजलं. सुरुवातीला तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, मात्र नंतर तिला तातडीने कानपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
पण तब्येत खालावत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर तिला लखनऊमार्गे एअरलिफ्ट करून तातडीने दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
"आम्ही पीडितेला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले पण ती वाचू शकली नाही. रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टर शलभकुमार यांनी दिली.
 
पीडितेच्या मृत्यूवेळी तिची बहिण हॉस्पिटलमध्ये उपस्थित होती. तिच्या मृत्यूनंतरही त्यांचं कुटुंब घाबरणार नाही. पुढची लढाई सुरुच राहील, असं तिच्या बहिणीने बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं.
 
पीडितेला जिवंत जाळल्याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.
 
पोलिसांनी काय सांगितलं?
उत्तर प्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी ती जात असताना पोलीस ठाण्याच्या रस्त्यातच आरोपींनी तिला घेरलं आणि आग लावली.
 
याप्रकरणात चारजणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली होती. त्यानंतर पाचव्या आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.
 
पीडितेने यावर्षी मार्चमध्ये दोघांविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, असं उन्नावचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी माध्यमांना सांगितलं.
 
तर पीडितेला जाळण्याच्या प्रकरणात आरोप असलेल्यांमध्ये बलात्काराचे आरोपीसुद्धा आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक एस. के. भगत यांनी दिली.
 
यातला एक आरोपी तुरुंगात गेला होता आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटून बाहेर आला होता. पीडितेच्या कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारच्या धमकीची तक्रार केली नव्हती. बाकीच्या गोष्टींचा तपास सुरु आहे.
 
पीडितेच्या कुटुंबीयांनी काय म्हटलं?
दुसरीकडे, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आरोपी सातत्याने त्यांना धमकावत होते. यापूर्वीही अनेकवेळा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा पीडितेच्या नातेवाईकांनी केला. 10 ते 12 वेळा काही लोकांनी त्यांना तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. तसंच घरावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला, असं पीडित मुलीच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं.
 
स्थानिक पत्रकार विशाल सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "पीडितेवर मार्च महिन्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणासाठीच ती रायबरेलीला चालली होती. पोलीस ठाण्याला जात असतानाच पाच जणांनी तिला रस्त्यात अडवलं. तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला."
 
माध्यमांमध्ये प्रकरण चर्चेला आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारसुद्धा सक्रिय झालं. पीडितेच्या उपचाराचा सगळा खर्च सरकार करेल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं.