शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2019 (15:59 IST)

भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने..

जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

आता तुम्ही सगळ्यांनी पिन कोड तर पाह्यलाच असेल. पाह्यला असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेलच की हो. पण कधी विचार केलाय, ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? ही आयडियाची कल्पना आहे  श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची. यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिलीय बरं...

PIN म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर्. हे घडलं १९७२मध्ये. तोपर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांचि विभागवार विभागणि व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाचि गावं, कधी  कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा!!  चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच. हे सगळं टाळण्यासाठी विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी ही पिनकोड पद्धत अंमलात आणण्यात आली.
पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली.  त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं.
पिनकोडची रचना अशी आहे.
पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत,  तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.
आता पाहूयात हा पिनकोड वाचायचा कसा..
यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल
११ – दिल्ली
१२ व १३ – हरयाणा
१४  ते १६ - पंजाब
१७ - हिमाचल प्रदेश
१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर
२० ते २८ - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड
३० ते ३४ - राजस्थान्
३६ ते ३९ - गुजरात्
४० ते ४४ - महाराष्ट्र
४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
५० ते ५३ - आंध्र प्रदेश
५६  ते ५९ - कर्नाटक
६० ते ६४ - तामिळनाडू
६७ ते ६९ - केरळ
७० ते ७४ - पश्चिम बंगाल्
५५ ते ७७ - ओरिसा
७८ - आसाम
७९ - पूर्वांचल
८० ते ८५ बिहार आणि झारखंड
९० ते ९९ - आर्मी पोस्टल सर्व्हिस्
म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक - सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक - ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.

आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा...!

श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते.
आज दुर्देवाने या श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.