मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

'चिं‍गी' - अपप्रवृत्नीवर प्रकाशझोत

PRPR
विज्ञान तंत्रज्ञानाने आपल्या क्षेत्रात प्रगतीचे गड सर केले असले तरी आजही आपल्या समाजात जुन्या चालीरिती आणि परंपरेचा खोल पगडा आहे. याचे प्रमुख उदाहरण म्हणजे 'मुलगी जन्माला येणे' म्हणजे कमीपणाचे मानले जाते. या सामाजीक प्रश्नावर अनेक प्रकारे प्रबोधन सुरू आहे मात्र, अजुनही म्हणावी तशी जागृकता झालेली नाही.

मुलीला जन्म दिला तर त्या मुलीचे आणि जन्मदात्या आईचे जीवन खडतर बनते. कितीही कडक कायदे झाले तरी स्त्री भ्रुणहत्येचे प्रकार थांबलेले नाहीत. समाजातील या अपप्रवृत्नीवर प्रकाशझोत टाकून प्रबोधन करण्याचा प्रयत्न 'चिं‍गी' या चित्रपटातून करण्यात आला आहे. पी.पी. क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माता-दिग्दर्शक राजा इसराणी यांनी हा संवेदनशील विषय आपल्या चित्रपटातून मांडला आहे.

'चिंगी' ही आरतीच्या आयुष्याची कथा आहे. लग्नानंतर तिच्यावरही सासरच्यांचा 'मुलगाच हवा' असा रेटा असतो. ही मागणी तिला अस्वस्थ करत असते. आपल्या आईला पाच मुली असल्याने तिला नेहमीच सासू कडून अपनास्पद ऐकावे लागत असते. मुलगी म्हणून आणि मुलगी नको म्हणून तिच्यावर होणारा अत्याचार या चि‍त्रपटातून मांडण्यात आला आहे. आरती हे चित्रपटाचे प्रतिक असले तरी समाजात अशा अनेक आरतींना हा छळ सहन करावा लागत आहे. त्यांची होणारी मानसिक, शारीरीक अवहेलना दाखवून या प्रश्नावर वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केवळ प्रश्न न मांडता या समस्येचे निराकरण कसे करता येईल, अर्थात मुलीना जन्म देण्याची का गरज आहे आणि मुलींही काय करू शकतात, हे देखील दाखविण्यात आले आहे.

यामध्ये लोकप्रिय कलाकारांचा सहभाग आहे. आरतीच्या भूमिकेत गिरीजा ओक आहेत. सोबत मिलिंद गवळी, रविंद्र गवळी, ईला भाटे, उज्वला जोग, हर्षांली झीने, अरूण बलसावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पाहुणे कलाकार म्हणून आदिती सारंगधर, मिलन शिर्के, श्वेता शिंदे, स्नेहा वाघ, चारूशिला वाच्छानी, नागेश भोसले, शुभांगी लाटकर, डॉ. विलास उजवणे, कांचन पगारे, संदीप भन्साली आदीं कलाकार आहेत.

अनिता इराणी यांची प्रस्तुती असणा-या या चित्रपटाची भावनाशील कौटुंबिक कथा श्री. कुरडे यांनी लिहली असून पटकथा व संवाद अशोक पाटोळे यांचे आहेत. बाबा पाटील यांनी दिग्दर्शन तर नरेंद्र पंडीत यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. रफीक शेख यांनी छायाचित्रण केले आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रौफ भंगडावाला यांनी काम पाहिले आहे. चित्रीकरण पुर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.