शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (09:15 IST)

आरे कॉलनीतील आगीवर तब्बत सहा तासांनंतर नियंत्रण

मुंबईतील आरे कॉलनीतल्या डोंगरावरील जंगलाला सोमवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. वृक्ष आणि सुक्या गवताने पेट घेतल्याने तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात आगीचा भडका पसरला. ही आग शहरातील वस्तीपर्यंत पोहोचते की काय? अशी भीती स्थानिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आहे. तब्बत सहा तासांनंतर अग्निशामक दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवल. 
 
वणवा पेटत असतानाच गोरेगाव येथील गगनचुंबी इमारतीमधील रहिवाशांकडून त्याचे फोटो समाजमाध्यमांवर अपलोड केले जात होते. गोरेगाव, दिंडोशी, फिल्मसिटी येथील नागरिकांकडून आगीचे फोटो काढत सोशल नेटवर्क साइट्सवर अपलोड केले गेले. दिंडोशी येथील न्यू म्हाडा कॉलनी येथील मागील बाजूस असलेल्या व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हिरवळीने नटलेल्या डोंगराला आग लावण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरवर्षी डोंगराला आग लावत डोंगर व हिरवळ, झाडे व झुडपे नष्ट केली जात असल्याचा आरोप येथील साद प्रतिसाद या संस्थेचे संदीप सावंत आणि शरद मराठे यांनी केला.