शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|
Last Modified: इस्लामाबाद , शनिवार, 13 सप्टेंबर 2008 (12:33 IST)

पाकिस्तानी सैन्यात दुफळीची शक्यता

पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात लपलेल्या तालिबानी अतिरेक्यांविरोधात अमेरिकी सैन्याने सीमेपलीकडून क्षेपणास्त्र हल्ले आणि गोळीबार सुरू केला आहे. त्याला तोंड देण्याच्या प्रश्नावरून आता पाकिस्तानी सैन्यातच दुफळी माजण्याची चिन्हे आहेत.

यासंदर्भात पाकिस्तानचे लष्करप्रमुख कियानी यांनी लष्कराच्या उच्चाधिकार्‍यांची दोन दिवसीय बैठक बोलवली होती. त्यात जमिनीवरून केल्या जाणार्‍या या हल्ल्याविरोधात कियानी यांनी जोरदार टीका केली होती. पण कियानी यांनीच अमेरिकेला जमिनीवरून हल्ला करण्याची अलिखित परवानगी दिली असावी आणि बहूतांश लष्करी अधिकार्‍यांना मात्र हे मान्य नसल्याचा कयास बांधला जात आहे. कियानी निष्प्रभ ठरून या हल्ल्यांना यापुढेही पाठिंबा देत राहिल्याचे चित्र उभे राहिले तर लष्करी अधिकार्‍यांत त्यांच्याविषयी नाराजी पसरू शकेल. सहाजिकच यामळे लष्करातच दुफळी असल्याचे चित्र पुढे जाईल व कियानी यांच्यापुढील डोकेदुखी वाढेल, असा अंदाज रॅंड कॉर्पोरेशनचे विश्लेषक सेठ जॉन्स यांनी व्यक्त केला आहे.

अफगाणिस्तानातील तालिबांन्यांनी पाकिस्तानातील ग्रामीण भागात आश्रय घेतला असल्यास त्यांचा खातमा करेपर्यंत त्यांच्याविरूद्धचे युद्ध संपले असे जाहीर करता येणार नाही, असे अमेरिका व नाटोच्या कमांडर्सनी यापूर्वीच म्हटले आहे.

अमेरिकी सैन्याने पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्ताना भागात गेल्या आठवड्यात काही हल्ले केले. त्यात काही तालिबानींना टिपण्यातही आले. पण तो प्रदेश ताब्यात आलेला नाही. तो घेण्यासाठी अमेरिकेला ही कारवाई पाकिस्तानी सैन्याच्या साथीने केली पाहिजे. पण अमेरिकेविरोधात वाढता जनप्रक्षोभ लक्षात घेता पाकिस्तानी सैन्य यात सहभागी होईल काय हा प्रश्न आहे.