शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

मूलतत्ववाद्यांचे केंद्र लाल मशीद

आमिर अहमद खान (बीबीसीचे पाकिस्तानातील संपादक )

इस्लामाबादमधील वर्षभरापासून चर्चेत असलेल्या लाल मशिदीचे मुस्लिम मुलतत्ववादाशी दशकभराचे नाते आहे. पाकची गुप्तचर संघटना आयएसआयचे मुख्यालय मशिदीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. आयएसआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपासून उच्चाधिकार्‍यांपर्यत सर्वांची येथे उठबस असते. अब्दुल अजीज व अब्दूल रशिद यांच्याकडे सध्या मशिदीचे व्यवस्थापन आहे.

अब्दूल बंधूंनी सूत्रे हाती घेण्याअगोदर त्यांचे वडिल मौलाना अब्दूल्ला व्यवस्थापन बघत होते. मात्र, त्यांचा मशिदीच्या आवारातच गोळ्या झाडून खून करण्यात आला. या खूनाचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. यानंतर मशिदीचा वापर मूलतत्ववाद्यांकडून होत गेला. अब्दूल बंधूंनी आपल्याकडे आत्मघाती पथके तयार असून आदेशासरशी ती हल्ला करण्यास तयार असल्याचा इशारा सरकारला कित्येकदा दिला आहे.

9 / 11 नंतर

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यापर्यंत लाल मशिदीतील कारस्थाने फारशी उघड झाली नाहीत. दहशतवादाविरूद्धच्या लढाईत पाक अमेरिकेचा सहयोगी झाल्यावर मशीद मूलतत्ववाद्यांचे अधिकृत आश्रयस्थान बनले. जैश- ए- मोहम्मदसारख्या पाकच्या दहशतवादी संघटनांचे अमेरिकेविरूद्ध कारस्थान रचण्याचे केंद्र मशि‍दच होते, अशी माहिती गुप्तचर अधिकार्‍याकडून मिळाली आहे.

मशिदीतच असणार्‍या मदरशातून विद्यार्थिनीही शिक्षण घेतात. मशिदीच्या आवारातील महिलांसाठीच्या मदरशात दोन ते तीन हजार मुली निवासी शिक्षण घेतात. येथून काही अंतरावरच मुलांचा जामिया-फरीदिया मदरसा आहे. येथ जवळपास पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मी मशिदीस पुष्कळदा भेट दिली, त्यावेळी मुले व मुली मुक्तहस्ते पिस्तूल, रायफल हातात घेऊन फिरत होते. पाकमधील मूलतत्ववादी संघटनांमध्ये या घटना विशेष नाही. परंतु, पाकमधील गुप्तचर संस्थांचा येथील कामकाज व घटनांमधील समावेश ही गंभीर बाब आहे. मशीद प्रशासन व या गुप्तचर संस्थांमध्ये साटेलोटे असल्याने सरकार कडक कारवाई करण्यापासून हात आखडता घेत होते.

आत्मघाती हल्ल्यांची धमकी

अब्दूल बंधूनी सरकारला आत्मघाती हल्ल्याची कित्येकदा उघड धमकी दिली आहे. मुशर्रफ यांनीही आत्मघाती हल्लेखोरांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकमध्ये या वादग्रस्त मशिदीबाबत दोन विचारप्रवाह आहेत. मशिद मुलतत्ववादी व गुप्तचर अधिकार्‍यांदरम्यान सहयोगाचे काम करते. त्यामुळे या अधिकार्‍यांना परराष्ट्रीय धोरणात मशीद पूरक असेपर्यंत कारवाई होणार नाही, हा पहिला प्रवाह आहे.

सरकारची राजकीय इच्छाशक्ती दृढ होईपर्यत लाल मशिद प्रकरणाचा गुंता सुटणार नाही, हा दुसरा प्रवाह आहे. मतप्रवाह काहीही असले तरी सरकार मशिदीवर कारवाई करणार असे अगदी बोटावर मोजण्याइतक्या नागरिकांना वाटते. परंतु, दंगलीत लोकांचे बळी गेल्यानंतर वातावरण अब्दूल बंधूंच्या विरोधात तापू शकते. उल्लेखनीय बाब म्हणजे येथील नागरिकांचा मूलतत्ववाद्यांविरोधात कारवाई करण्याच्या मुशर्रफ यांच्या क्षमतेवर विश्वास नाही.

(बीबीसी हिंदी या संकेतस्थळावरून अनुवादित.)