शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जानेवारी 2020 (10:22 IST)

उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये 'फ्री काश्मीर'चा बोर्ड दाखवणार्‍या महेक प्रभूवरील गुन्ह्यावरून मतभेद

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ संपूर्ण देशभर आंदोलनं सुरू झाली. गेटवे ऑफ इंडियाला विद्यार्थ्यांच्या झालेल्या आंदोलनात महेक मिर्झा प्रभू या मुलीने 'फ्री काश्मीर' चा फलक दाखवला आणि त्यावर राजकारण पेटलं.
 
याप्रकरणी कुलाबा पोलीसांनी महेक प्रभूवर गुन्हा दाखल केलाय. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना महेकवर गुन्हा दाखल होण्याआधी विचारलं असता, त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं "महेकची आम्ही माहिती घेतोय. तिला याबाबत विचारलं असता कोणीतरी लिहीलेला मी फलक उचलला आणि दाखवला असं तिचं म्हणणं होतं. तिची पार्श्वभूमी तपासली जाईल. असच न बघता कोणी बोर्ड दाखवू शकत नाही. त्यादृष्टीने चौकशी करू."
जर उद्देश राष्ट्रविरोधी असेल तर तिच्यावर कारवाई केली जाईल असही ते म्हणाले. गृहमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलल्यानंतर त्याच रात्री महेक प्रभू या मुलीवर कुलाबा पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
 
मंत्र्यांची परस्परविरोधी भूमिका
महेक प्रभूची भूमिका ही राष्ट्रविरोधी वाटत होती त्यामुळे तिची चौकशी करण्यासाठी पोलीसांनी गुन्हा दाखल केलाय. पण काश्मीरमधली अस्थिरता ही 'फ्री काश्मीर' फलकामागची भूमिका असल्याचं महेक प्रभूचं म्हणणं आहे.
 
"तिची चौकशी सुरू आहे. पण अद्याप तिचा उद्देश हा राष्ट्रविरोधी असल्याचं स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे चौकशी दरम्यान जर हे स्पष्ट झालं नाही तर तिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पुर्नविचार करू," असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. पण चौकशी करून जर राष्ट्रविरोधी उद्देश असेल तर गुन्हा दाखल केला जातो, पण चौकशी आधीच गुन्हा का दाखल केला? या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं.
 
ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत बोलताना म्हटलं, "फ्री काश्मीर आणि स्वतंत्र काश्मीर या दोन शब्दात फरक आहे. प्रत्येकालाच माहिती आहे की काश्मीरमध्ये इंटरनेट बंदी आहे. राजकीय नेते हे नजरकैदेत आहेत. त्या मुलीने याआधीच तिने दाखवलेल्या फलकाबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे तिच्यावर आणि तिच्याबरोबरच्या काही जणांवर गुन्हे दाखल करणं हे चुकीचे आहे. त्यांची चौकशी करून गुन्ह्याबाबत पुर्नविचार करावा ही माझी मागणी आहे."
 
"मी विद्यार्थ्यांबरोबर आहे आणि राहणार," असं वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. पण फ्री काश्मीरबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत विचारलं असता त्यांनी यावर बोलणं टाळलं.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 'फ्री काश्मीर'च्या मुद्यावर आक्रमक झाले. राष्ट्रविरोधी आंदोलनं मुंबईत कशी खपवून घेतली जातात, असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना मंत्री जयंत पाटील यांनी तो फलक राष्ट्रविरोधी नसून काश्मीरच्या अस्थिर परिस्थितीबद्दल असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना याबाबत प्रतिक्रीया विचारली असता मला महेक प्रभूच्या गुन्ह्याबाबत काही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं.
पोलीस हे फडणवीसांच्याच धाकात?
"हे नवीन सरकार आहे. पण अनेक वरिष्ठ पदांवर पोलीस अधिकारी हे फडणवीस सरकारच्याच सरकारच्या काळातले आहेत. पोलीस गुन्हे दाखल करायला घाई करतायेत असं वाटतं. अनिल देशमुख यांना गृह खात्याचा अनुभव नाही. त्यामुळे या सरकारचा गोंधळ होतोय," असं लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदिप प्रधान यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलंय.