शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (18:09 IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ६ सप्टेंबर रोजी प्रचार मोहिमेचा शुभारंभ

आगामी विधानसभा निवडणूक २०१४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचार मोहिमेचा शुभारंभ शनिवार दि.६ सप्टेबंर रोजी दुपारी ३.०० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास माजी केद्रिंयमंत्री खा.प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार तसेच सर्व कॅबिनेट, राज्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद उपसभापती, आजी व माजी खासदार व आमदार /सहयोगी आमदार, मुंबई विभागीय अध्यक्ष, सर्व प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल, सेलचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, निरिक्षक, विभागीय प्रभारी तसेच सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष/ महापौर/उपमहापौर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

यापुर्वी पक्षाच्या सर्व फ्रंटल तर्फे शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन समतेची दिंडी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समवेत कार्यक्रम स्थळी आणली जाणार आहे. यावेळी पक्षाच्या वतीने ‘कालचक्र प्रगतीचे’ या संक्षिप्त कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या विधानसभेसाठीच्या प्रचारगीताचे आणि प्रचार जाहिरातींचे अनावरण करण्यात येणार आहे. मुंबईतील या निवडणुक प्रचार मोहिमेच्या शुभारंभ मेळाव्यानंतर कोल्हापूर, औंरगाबाद, नाशिक येथे प्रचार शुभारंभाचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

तसेच गेल्या महिन्याभरात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनिल तटकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांचे निर्धार मेळावे घेऊन जनतेशी संवाद साधला. सबंध राज्यात या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने एक चैतन्याची लाट तयार झाली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक, युवती, विद्यार्थी, महिला, अल्पसंख्याक, डॉक्टर्स विभाग व सेलच्या माध्यमांतून राज्यभरात वेगवेगळे उपक्रम, संवाद अभियाने राबवून पक्षाचे काम जनते पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला. राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रभारी उषाताई दराडे व महिला अध्यक्ष आ.विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध महिला मेळाव्यांच्या माध्यमांतून तसेच ‘रणरागिणी तुझी कहाणी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाव्दारे  पक्षाची महिलांबाबतची पुरोगामी भूमिका तसेच महिलांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय महिलांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. 

त्याचबरोबर पक्षाच्या युवक विभागाच्या वतीने राज्यभरात युवा संवाद अभियान राबवून त्या माध्यमांतून अनेक युवकांना एकत्र करुन पक्षाची ध्येय, धोरणे, शासनाची विकासकामे जनतेंपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. युवा संवाद अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १४ जिल्ह्यातील ५५ युवक मेळाव्याच्या माध्यमातून १लाख युवकांशी थेट संवाद साधण्यात आला.या युवा संवाद अभियानाच्या माध्यमातून युवक प्रभारी आ.धनंजय मुंडे, आणि युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी युवकांशी संवाद साधला.

पक्षाच्या विद्यार्थी विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष निलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कँम्पस कॉर्नरच्या माध्यमांतून राज्यभरातील महाविद्यालये,महत्वाच्या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमांतून आघाडी सरकारने केलेली कामे, जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला. या कँम्पस कॉर्नरच्या माध्यमांतून १५०० महाविद्यालयातील दिड लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला गेला.

त्याच बरोबर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमांतून राज्यात युवती निर्धार अभियानाची सुरुवात करुन विविध शासकीय योजनाची, शासननिर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने देखील राज्यभरात अल्पसंख्याक समाजाचे मेळावे घेऊन आघाडी सरकारने अल्पसंख्याकासाठी केलेली कामे,विविध योजनांची माहिती त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला.यासाठी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हबीब फकिह,आणि माजी खा.मौलाना ओबेदुल्लाह आझमी  यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अल्पसंख्याकांचे मेळावे घेण्यात आले.तसेच डॉ.नरेंद्र काळे, डॉ.समीर दलवाई यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या माध्यमांतून आरोग्य संवाद अभियान राबवून सरकारने जनतेसाठी राबविलेल्या विविध आरोग्य विषयक योजना,विविध आजारांविषयी पोस्टर,चित्रप्रदर्शन,माहिती पत्रके याद्वारे जनजागृती करण्यात आली.

एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या विविध विभागानी केलेल्या कामांमुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.