शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By अभिनय कुलकर्णी|

अंधार पडल्याने रेड्डींचा शोध अवघड

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या शोधासाठी लष्कर आणि पोलिस दोन्ही प्रयत्न करत असूनही हे वृत्त लिहेपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता. अवकाश संशोधन संस्थाही (इस्त्रो) उपग्रहाद्वारे रेड्डी यांचा शोध घेत आहे. मात्र, आता अंधार पडल्याने रेड्डी यांचा शोध लागणे अवघड बनले आहे. त्यामुळेच हेलिकॉप्टरद्वारे सुरू असलेला शोध थांबविण्यात आला असून जमिनीवरून पोलिस व लष्कराचे जवान यांचा शोध सुरू आहे.

श्री. रेड्डी आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास हैदराबादहून नक्षलग्रस्त भागातील चित्तूर येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टरमधून निघाले होते. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि ते गायब झाले. त्यानंतर आतापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. हवाई दलाची पाच आणि एक खासगी हेलिकॉप्टर त्यांचा शोध घेत आहे. मात्र, अंधार पडल्याने त्यांचे काम दुष्कर झाले आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांच्यासमवेत त्यांचे स्वीय सचिव, त्यांचे सुरक्षा अधिकारी आणि दोन पायलट आहेत.

दरम्यान, नल्लामल्ला या जंगल भागात मुख्यमंत्र्यांचे हेलिक़ॉप्टर गायब झाले आहे. हे जंगल कुर्नूल आणि त्यालगतच्या जिल्ह्यात मोडते. या भागातील लोकांनी मुख्यमंत्र्यांचा शोध घ्यावा आणि काही माहिती मिळाल्यास पोलिसांना सतर्क करावे असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री के. रोसियाह, मुख्य सचिव रमाकांत रेड्डी यांनी केले आहे.

रेड्डी यांच्या गायब होण्याने दिल्लीतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळही हादरले आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग आणि कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आंध्र सरकारच्या सतत संपर्कात आहेत. राज्य सरकारनेही गृह आणि संरक्षण विभागाला या विषयाची सूचना दिली असून सतर्क राहण्यास सांगितले आहे. चालकरहित विमान पाठवून शोध घ्यावा असे आंध्र सरकारतर्फे केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे.

'आम्हाला अद्याप मुख्यमंत्र्यांविषयी काहीही माहिती मिळालेली नाही. जोरदार वारे आणि पाऊस यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर एखाद्या निर्जन ठिकाणी उतरवावे लागले असेल. अशी शक्यता मुख्य सचिव रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री गायब

कोण आहेत डॉ. रेड्डी