शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

राहुल गांधींनी 'छोट्या' हॉटेलमध्ये खाल्ला डोसा, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाटण्यात एका मानहानीच्या खटल्यात जामीन मिळाला. तिथून दिल्लीत परतताना पाटण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये डोशाचा आस्वाद घेतला.
 
यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल, प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि राज्यसभेचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह त्यांच्याबरोबर होते.
 
पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार त्यांनी तिथे डोसा आणि कॉफीचा आस्वाद घेतला. तसंच काही लोकांनी सुरक्षित अंतर ठेवून त्यांच्याबरोबर फोटोही काढून घेतले.
 
राहुल गांधी यांनी डोशाचा आस्वाद घेताना काही लहान मुलांनी त्यांच्याशी संवाद साधला.
 
"राहुल हे सर्वांशी अत्यंत प्रेमाने बोलले. काही मुलांना राहुल यांच्याशी संवाद साधायची इच्छा होती राहुल यांनी त्यांना देखील वेळ दिला", असं ट्वीट काँग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी केलं आहे.
 
सोशल मीडियावर चर्चा
दरम्यान राहुल गांधींच्या डोसा खाण्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
 
राज वर्मा नावाचे ट्विटर युजर यांनी उपरोधिक ट्वीट केले आहे. "असं केल्यामुळे त्यांनी फार उपकार केलेत, आता त्यांचं नशीब बदलणार आहे", असं त्यांनी ट्विट केलं आहे.
 
रवी त्रिपाठी नावाच्या युजरने राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. "माननीय राहुल गांधीच्या साधेपणाचं आम्ही कौतुक करतो. तुम्ही आमचे प्रेरणास्रोत आहात. तुमच्या प्रकाशाने आम्ही कार्यकर्ते प्रज्ज्वलीत झालो आहोत." अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींचा गौरव केला आहे.
 
अमन नावाच्या युजरने हे हॉटेलच छोटं नाही असा एक तर्क लढवला आहे. त्यांच्या मते, "हे हॉटेल पाटण्यातलं सगळ्यात महागडं हॉटेल आहे. पण जे लोक चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना सगळं छोटंच दिसतं. हे बिहार आहे आणि इथे छोटं काहीच नसतं", असं म्हटलं आहे.
 
पियुष कुमार नावाच्या युजरने आठवण सांगितली. त्यांच्या मते त्या 'छोट्या' हॉटेल मध्ये पार्टी करण्यासाठी मला पैसे जमा करावे लागायचे.