शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 3 डिसेंबर 2019 (15:18 IST)

चंद्राच्या पृष्ठभागावर 'नासा'ला विक्रम लँडरचे अवशेष सापडले

चंद्राच्या पृष्ठभागावर 'चांद्रयान 2'च्या विक्रम लँडरचे अवशेष सापडल्याची माहिती अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'नं दिलीये. 'नासा'नं विक्रम लँडरच्या अवशेषांचा फोटोही प्रसिद्ध केलाय.
 
नासाच्या लुनार रिकॉनिसेंस ऑर्बिटरच्या (LRO) माध्यमातून विक्रम लँडरचे अवशेष कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
 
विक्रम लँडरचा जिथं इस्रोशी संपर्क तुटला होता, त्या ठिकाणापासून उत्तर-पश्चिम दिशेला 750 मीटर अंतरवार हे अवशेष सापडले.
 
भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान 'विक्रम लँडर'चा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वीच संपर्क तुटला होता. त्यानंतर विक्रम लँडरचा ठावठिकणा इस्रोला लागत नव्हता. मात्र, नासानं ट्वीट केलेल्या फोटोमुळं विक्रम लँडरचं ठिकाण कळण्यास मदत झालीये.
 
चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्रभूमीच्या अगदी जवळ गेलेल्या विक्रम लँडरचा दुसऱ्या टप्प्यातील वेग नियोजित वेळेपेक्षा अधिक असल्यानं 'सॉफ्ट लँडिंग' होऊ शकलं नव्हतं. चंद्रभूमीपासून 500 मीटर अंतरावर विक्रम लँडरचं 'हार्ड लँडिंग' झालं, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली होती.